वडोदरा, दि. 24 (वृत्तसंस्था) – हरलीन देओलच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी महिला संघाने वेस्ट इंडीजच्या महिलांचा 115 धावांनी पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसरा आणि अंतिम सामना 27 डिसेंबरला खेळला जाईल.
धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात पहिल्या डावात हरलीनने 115 धावांची शतकी खेळी करत हिंदुस्थानला 358 धावांचा डोंगर उभारून दिला. विंडीजच्या महिलांना हे 359 धावांचे आव्हान पेलवलेच नाही. विंडीजची कर्णधार आणि सलामीवीर हेली मॅथ्यूजने 109 चेंडूंत 106 धावांची आक्रमक खेळी करताना संघाच्या विजयासाठी एकाकी झुंज दिली. तिच्या शतकामुळे वेस्ट इंडीजचा डाव 243 पर्यंत पोहचू शकला. तिने शेमेन कॅम्पबेलसह पाचव्या विकेटसाठी केलेल्या 112 धावांची भागी केली.
कॅम्पबेलने 38 धावांची चिवट खेळी केल्यामुळेच विंडीजला दोनशेचा टप्पा गाठता आला. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा आणि टिटास साधू या दोघींनी प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या तर प्रिया मिश्राने 49 धावांत 3 विकेट मिळवल्या.
19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती
त्याआधी गेले दोन आठवडे सुपर फॉर्मात असलेल्या स्मृती मानधनाने आजही आपला अर्धशतकी झंझावात कायम राखत सलग सहावे अर्धशतक साजरे केले. तिने गेल्या सहा डावांत 53, 91, 77, 62, 54 आणि 105 अशा खेळय़ा करत आपला जबरदस्त खेळ पेश केला. तिने प्रतिका रावलसह 110 धावांची सलामी दिली.
त्यानंतर रावल (76) आणि हरलीन देओलने 62 धावांची भर घातली. मग हरलीनन हरमनप्रीत कौरबरोबर 43 तर जेमिमा रॉड्रिग्जबरोबर (52) चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागी रचल्यामुळे हिंदुस्थानी संघ 358 धावांपर्यंत मजल मारू शकला. आजच्या प्रचंड धावसंख्येच्या सामन्यात हिंदुस्थानी महिलांनी 43 चौकार आणि 4 षटकार खेचले, तर विंडीजच्या फलंदाजांनीही 32 चौकारांचा हल्ला चढवला.