ख्रिसमसवर बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? काँग्रेसचा नरेंद्र मोदी यांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमसवर बोलतात. नाताळनिमित्त सामाजिक सौहार्दाबद्दल बोलतात. जर्मनीतील बाजारात झालेल्या हल्ल्याचा निषेध करतात. परंतु, मणिपूरवर चकार शब्दही काढत नाही. ख्रिसमस साजरा करणारे आणि त्यावर इतके बोलणारे पंतप्रधान मणिपूरवर का बोलत नाहीत? असा परखड सवाल काँग्रेसने मोदींना केला आहे. बेळगावात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी दिली. या पत्रकार परिषदेनंतर वेणुगोपाल पत्रकारांशी बोलत होते.

जेव्हा जेव्हा सांप्रदायिक मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भाजपची भूमिका एका बाजूला असते, असे काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल म्हणाले. भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळे कायद्यावरून स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. राहुल गांधी हे अनूसुचित जाती, जमाती, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गांतील गरीबांसाठी लढत आहेत. भाजपचे नेते केवळ एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहेत. जेव्हा आम्ही या व्यक्तीविरोधात बोलतो तेव्हा भाजपचे खासदार संसद बंद पाडतात, आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. जनतेला हे सगळे माहीत आहे असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.