19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती

लेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱया आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली. पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला निवड समितीने संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व निकी प्रसाद करणार आहे तर सानिका चाळके उपकर्णधार असेल. संघात कमलिनी जी आणि भाविका अहिरे यांच्या रूपाने दोन यष्टिरक्षक आहेत, तर नंदना एस, इरा जे आणि अनादी टी या राखीव खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघ गतविजेता आहे. हिंदुस्थानला मलेशिया, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेसह ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थान आपल्या अभियानाची सुरुवात 19 जानेवारीला वेस्ट इंडीजविरुद्ध करणार आहे. त्यानंतर मलेशिया (21 जानेवारी) आणि श्रीलंका (23 जानेवारी) यांच्याविरुद्ध लढती होणार आहेत.

गटसाखळी सामने 19 ते 23 जानेवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक अव्वल तीन संघ 25 ते 29 जानेवारीदरम्यान सुपर सिक्समध्ये खेळतील. सहा-सहा संघांचे दोन गट सुपर सिक्समध्ये खेळतील. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरी गाठतील. 31 जानेवारीला उपांत्य सामने तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल.

हिंदुस्थानी महिला संघ ः निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी. त्रिशा, कमलिनी जी (यष्टिरक्षक), भाविका अहिरे (यष्टिरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्ही.जे., सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रिथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एम.डी. शबनम, वैष्णवी एस.

राखीव खेळाडू ः नंदना एस, इरा जे, अनादी टी.