मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात मंगळवारी साप शिरला आणि सर्वांचीच तारांबळ उडाली. न्यायालयाच्या दालनात असलेल्या फायलींच्या ढिगाऱ्यावर सापाने बस्तान मांडले होते. मात्र काही वेळात तेथून गायब झालेला साप नंतर सर्पमित्रांनी कसून शोध घेऊनही सापडला नाही. या गोंधळात न्यायालयीन कामकाज तासभर खोळंबले.
मुलुंडच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयातील 27 क्रमांकाच्या कोर्टरूममध्ये मंगळवारी दुपारपर्यंत नियमित कामकाज सुरू होते. याचदरम्यान न्यायालयात डय़ुटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फायलींच्या ढिगाऱ्यावर साप असल्याचे आढळले. दोन फूट लांबीच्या सापाला पाहून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह सर्वच भयभीत झाले. न्यायदंडाधिऱ्यांनाही कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. कोर्टरुममध्ये साप असताना कुणी काम करण्यास पुढे धजावले नाही. त्या सापाला वेळीच पकडून जंगलात सोडण्याच्या हेतूने सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात साप फायलींच्या ढिगामधून गायब झाला. त्यामुळे कोर्टरूममध्ये दाखल झालेल्या सर्पमित्रांना सापाला न पकडताच रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले. बराच वेळ साप न सापडल्याने शोधमोहीम थांबवण्याचा आणि न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतला.
‘तो’ गायब झाला, मात्र दहशत कायम
मुलुंड न्यायालय परिसरात अनेक झाडे आहेत. या झाडांमध्ये साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो. यापूर्वीही काही वेळा कोर्टरूममध्ये सापाने घुसखोरी केली होती. एकदा कोर्टरूमच्या खिडकीवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न सापाने केला होता. दोन महिन्यांपूर्वीही न्यायदंडाधिकाऱ्यांच्या दालनात साप आढळला होता. त्यामुळे गायब झालेला साप कोर्टरूममध्ये पुन्हा कधी शिरेल याचा नेम नाही, अशी भीती एका वकिलाने व्यक्त केली.