IND vs AUS – हॅपी एण्डिंगसाठी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया सज्ज; उद्यापासून एमसीजीवर चौथा कसोटी सामना

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या नववर्षाची सुरुवात धडाकेबाज विजयाने केली होती. त्यामुळे आपल्या वर्षाचीही एंडिंग हॅपी करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकात दोघेही सध्या 1-1 अशा बरोबरीत असल्यामुळे मेलबर्नच्या ‘बॉक्सिंग कसोटी’त जो विजयी पंच मारणार तोच जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपला दावा अधिक मजबूत करणार.

गोलंदाजीत बदलाची शक्यता

हिंदुस्थानच्या संघव्यवस्थापनाने गेल्या तीन कसोटींप्रमाणे चौथ्या कसोटीतील अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा केली नाही. मात्र या कसोटीत चार वेगवान गोलंदाजांऐवजी दोन फिरकीवीर आणि तीन वेगवान गोलंदाज मैदानात उतरवणार असल्याचे संकेत दिले आहेत. तनुष कोटियन संघाबरोबर दाखल झाला असला तरी त्याला संघात स्थान नाही. मात्र रवींद्र जाडेजाच्या साथीला वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीला संधी देण्याची शक्यता आहे. तसेच तिसरा गोलंदाज म्हणून नितीश रेड्डी आणि आकाश दीपपैकी कुणाची वर्णी लागतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपचा मारा अधिक प्रभावी वाटत असल्यामुळे अष्टपैलू नितीशला ब्रेक मिळू शकतो. परंतु दोघांपैकी कोण खेळणार याचा फैसला रोहित शर्मा नाणेफेकीच्या वेळी निश्चित करणार आहे. त्यामुळे कुणाचा काwल लागेल हे अनिश्चितच आहे.

पंत, गिल आणि जैसवाल एकाच बोटीतील प्रवासी

ऋषभ पंत, शुबमन गिल आणि यशस्वी जैसवाल हे सध्या आक्रमकतेच्या एकाच बोटीतील प्रवासी आहेत. ते आक्रमकपणे खेळण्यासाठीच आहेत. गेल्या काही डावांत ते अपयशी ठरले असले तरी त्यांना सावधपणे खेळण्याचा सल्ला देऊन त्यांच्या मानसिकतेला छेडण्याचा प्रयत्न आपण करणार नसल्याचे रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले. त्यामुळे एमसीजीवर संघ कोणत्याही स्थितीत असो, यांची बॅट आक्रमकपणाच दाखवणार याचे संकेत रोहितने पुन्हा दिले. तिघांनी चांगली कल्पना आहे की, आपल्याला नेमके काय करायचेय. तिघेही प्रतिभाशाली फलंदाज आहेत. गेल्या काही डावांत त्यांचे डावपेच फसले असले तरी ते एमसीजीवर आपल्या लौकिकानुसार खेळ करून धावांचा पाऊस पाडतील, असा विश्वासही रोहित शर्माने बोलून दाखवला. या तिघांनी असाच खेळ करावा, तसाच खेळ करावा, असा सल्ला देऊन आम्ही त्यांच्यावर दबाव टाकण्याची चूक करणार नाही. त्यांना जसे खेळायचेय तसे त्यांना खेळण्याची सूट देण्यात आलीय आणि त्यांनी नेहमीच संघाला यश मिळवून दिले आहे, असेही रोहित म्हणाला.

हिंदुस्थान हॅटट्रिक करणार

एमसीजीवर हिंदुस्थानने गेल्या दोन्ही कसोटींत विजय मिळवत ऑस्ट्रेलियन भूमीवर आपली दहशत दाखवली आहे. 2018 च्या मालिकेत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव केला होता, तर 2020 साली 8 विकेटनी धक्का देत हिंदुस्थानने मालिकाही आपल्या खिशात टाकली होती. आता तीच विजय मालिका कायम राखत एमसीजीवर हॅटट्रिकचा पराक्रम नोंदविण्याची ऐतिहासिक संधी हिंदुस्थानला लाभली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. एमसीजीवर सत्ता कुणाची असेल ते येत्या दोन-तीन दिवसांत कळेलच, पण ही कसोटी अनिर्णितावस्थेत संपण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या 12 कसोटीत क्रिकेटप्रेमींना केवळ हार-जीतच पाहायला मिळालीय. वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा तसाच थरारक आणि निर्णायक सामना पाहण्याचे भाग्य क्रिकेटप्रेमींना लाभणार यात शंका नाही. 2017 साली एमसीजीवर शेवटचा अनिर्णित सामना खेळला गेला होता.

पुन्हा बोलॅण्ड संघात

ऑस्ट्रेलियन संघातून जॉश हेझलवूड बाहेर गेल्यामुळे आता त्याच्या जागी पुन्हा एकदा स्कॉट बोलॅण्डची निवड करण्यात आली आहे. गुलाबी चेंडूच्या कसोटीतही बोलॅण्डला संधी देण्यात आली होती आणि त्याने चांगला मारा केला होता. आता पुन्हा एकदा संघात तो दाखल झाला आहे आणि तोच पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कच्या साथीने गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तसेच गेले तीन कसोटींत संधी लाभलेल्या नॅथम मॅकस्विनीला वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी 19 वर्षीय सॅम कोनस्टासला पदार्पणाची संधी लाभणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला अद्याप दमदार सलामीवीर गवसला नसून क्रिकेट ऑस्ट्रेलिया सातत्याने नवनव्या फलंदाजांना आजमावत आहे. त्याच पंक्तीत आता कोनस्टासचेही नाव जोडले गेले आहे. एक गोलंदाज आणि एक फलंदाज असे दोन बदल वगळता ऑस्ट्रेलियन संघात नऊ खेळाडू गेल्या कसोटीतीलच असतील.

ऑफ स्टम्पबाहेरच्या चेंडूपासून सावध राहा

हिंदुस्थानच्या सर्वच फलंदाजांना आता सारेच दिग्गज फलंदाज एकच सल्ला देत आहेत. तो सल्ला म्हणजे ऑफ स्टम्पबाहेरच्या चेंडूंना छेडू नका. गेल्या तिन्ही कसोटींत हिंदुस्थानच्या सर्वच महत्त्वाच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सातत्याने आपल्या जाळय़ात अडकवले आहे. किमान एमसीजीवरही हेच चित्र दिसू नये म्हणून सुनील गावसकर यांच्यासह मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग, चेतेश्वर पुजारासह रवी शास्त्राr, संजय मांजरेकर यांनीही ऑफ स्टम्पचीच री ओढली आहे. इतक्या दिग्गजांनी सांगितल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाज किती गांभीर्याने फलंदाजी करतात ते कसोटीत दिसेलच.

विजयी शेवट कुणाचा

2024 साली हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी विजयी श्रीगणेशा केला होता. हिंदुस्थानने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेला नमवले होते तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारत आपल्या नववर्षाची दिमाखदार सुरुवात केली होती. हिंदुस्थान वर्षभरात 14 कसोटी खेळला असून 8 कसोटी सामन्यांत विजय तर 5 सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाला वर्षभरात केवळ 8 सामनेच खेळायला मिळाले आहेत आणि त्यात केवळ ते दोनच सामने हरलेत. पाच सामन्यांत त्यांनी दमदार विजय नोंदवले आहेत. एकूण पाहता दोन्ही संघांसाठी हे वर्ष समाधानकारक गेले असले तरी वर्षाचा शेवट कुणाचा सुखद होतो, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

अपयशी कर्णधाराने केली अपयशी विराटची पाठराखण

या वर्षी सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्माच्या फलंदाजीची चिंता तमाम क्रिकेट चाहत्यांना आहे. मात्र याच अपयशी कर्णधाराला विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल छेडले असता महान फलंदाज आपला मार्ग स्वतःच तयार करतात, असे उद्गार काढत आपल्याला विराटबाबत जराही चिंता नसल्याचे दाखवून दिले. हे कसोटी क्रिकेटचे पूर्ण वर्ष विराट आणि रोहितसाठी निराशाजनक ठरले आहे. त्यांच्या अपयशामुळे हिंदुस्थानी फलंदाजीही कमकुवत झाल्याचे चित्र गेल्या काही कसोटी सामन्यांत पाहायला मिळाले आहे. दोघांच्या क्लासबद्दल कोणालाही शंका नसली तरी त्यांचे अपयश संघासाठी घातक ठरतेय, याची किमान भीती त्यांचा मनात नक्कीच निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर एमसीजीवरही त्यांच्या बॅटने आपले रौद्ररूप दाखवले नाही तर ही त्यांची अखेरची कसोटी मालिकाही ठरू शकते.

बॉक्सिंग डे कसोटी संभाव्य संघ

हिंदुस्थान – यशस्वी जैसवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स पॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.