पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर पदभार स्वीकारताच मंत्र्यांची चमकोगिरी सुरू झाली आहे. त्यात कमबॅक केलेल्या आणि नव्यानेच मंत्रिपद मिळालेले मंत्री तर ‘चॅनल’चे कॅमेरे लावून अधिकाऱ्यांना थेट धमकावताना दिसले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चॅनेल्सचा लवाजमा बोलवून छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहाला भेट दिली. तेथील दुरवस्थेवरून त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शासनाने करोडो रुपयांचा निधी दिला तो गेला कुठे? लाज वाटत नाही का पैसे खायला? एक दिवस इथे राहून दाखवा, असा दम कॅमेऱ्याकडे पाहतच शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना भरला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, पुण्यात बैठक घेणार असेही त्यांनी दरडावले. एका महिला अधिकाऱ्यालाही त्यांनी धमकी दिली.

पोलीस ठाण्यात बसून अधिकाऱ्यांना वार्निंग

गृह राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी रात्री उशिरा नवी मुंबईतील पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस ठाण्यात बसून अधिकाऱ्यांची त्यांनी हजेरी घेतली आणि या भागातील गुन्हेगारीचा अहवाल द्या, असे बजावत चमकोगिरी केली. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनीही चॅनेल्सना आवताण देत पदभार स्वीकारला आणि खात्यात माझा धाक निर्माण करणार, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

पैसे देऊन बदली आता विसरा!

आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन किंवा शिफारशीद्वारे बदली करून घेता येणार नाही. सरकारला आम्ही कसेही मॅनेज करू या भ्रमात कुणीही राहू नये. नियमाच्या बाहेर जाऊन देवेंद्र फडणवीस कोणतेही काम करणार नाहीत, हे लक्षात ठेवा, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑन कॅमेरा दिला.