मलाही महाराष्ट्रात फिरताना भीती वाटते! सुप्रिया सुळे यांच्या विधानामुळे खळबळ

‘बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्या, त्यावर विश्वास बसत नाही. आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचे चित्र पाहायला मिळायचे ते महाराष्ट्रात वास्तवात दिसू लागले आहे. या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. मलाही महाराष्ट्रात फिरताना भीती वाटते,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘परभणीतील घटना महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे. अर्थात, त्या ठिकाणी शरद पवार गेल्यानंतर राज्यातील इतर नेते, लोक गेले. तोपर्यंत कोणीही त्या ठिकाणी भेट द्यायला गेले नव्हते. मात्र फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्या घटनेमागे कोण आहे हे शोधले पाहिजे.’ फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांनी महाराष्ट्राला न्याय द्यावा.

सुरेश धस, नमिता मुंडदा यांचे कौतुक करते. कारण राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढण्याची आज आवश्यकता आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यात क्राइम वाढत आहे. जेव्हा गुन्हेगारी वाढते, तेव्हा आर्थिक विकास मंदावतो. महाराष्ट्रात वाढती गुन्हेगारी ही अर्थकारणाला खीळ बसवणारी ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पहिल्यांदाच मी माध्यमांसमोर महिलांना अस्वस्थ आणि रडताना पाहते आहे. आम्हाला भीती वाटते, असे त्या म्हणत आहेत. महिला आरक्षणाचे बिल या सरकारने आणले. लाडकी बहीण म्हणून निधी दिला, मग महिलांची सुरक्षा सरकारची जबाबदारी नाही का?

बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरू! भाजप आमदार धस यांचा मुंडेंवर हल्ला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नसून, गँग्ज ऑफ वासेपूर सुरू असल्याचा आरोप केला व मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. आरोपी विष्णू चाटे छोटा आका आहे. पोलिसांनी त्याला पकडले नाही तो सरेंडर झाला. त्याचा मोठा आका आत गेला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल, असे सांगताना परळीत जाऊन अराजकता बघा, असे धस यांनी सुनावले.