वांद्रे निर्मलनगरमधील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या आणखी 20 कुटुंबांनाही ‘म्हाडा’ने आज घराबाहेर हुसकावून लावले असल्याने आता तब्बल 70 मराठी कुटुंबे ‘रस्त्यावर’ आली आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना ‘म्हाडा’ने पोलिसी बळाचा वापर करून रहिवाशांना सामानासह घराबाहेर काढले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून ‘म्हाडा’ने आम्हाला घराबाहेर हुसकावले तरीही न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरच राहणार असल्याचा निर्धार निर्मलनगरवासीयांनी केला आहे.
वांद्रे निर्मलनगर येथे म्हाडा संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मराठी कुटुंबांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असून 2 जानेवारी रोजी याबाबत सुनावणीदेखील होणार आहे. असे असताना ‘म्हाडा’ने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा धाक दाखवून कालपासून संक्रमण शिबिरातील इमारत क्र. 9 आणि 10 या दोन इमारतींमधील रहिवाशांना घराबाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आज दुसऱ्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली.
आम्ही इथे 40 वर्षे राहतोय, आता हक्काचेच घर हवे!
संक्रमण शिबिरातील रहिवाशांना विकासकाच्या माध्यमातून 23 मजल्यांचा ट्रांझिस्ट कॅम्प बांधून राहण्यास जागा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र आम्ही या ठिकाणी गेल्या 40 वर्षांपासून राहत असल्यामुळे आम्हाला आता कायमस्वरूपी हक्काचेच घर मिळायला हवे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. सरकार रस्त्यावर झोपडी बांधून राहणाऱ्यांनाही हक्काचे घर देते, मग आमचा गुन्हा काय, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
दुर्दैवी घटना घडल्यास म्हाडा जबाबदार
70 कुटुंबांतील रहिवाशांना घराबाहेर काढताना त्यांच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने हे रहिवासी कालपासून दिवसरात्र रस्त्यावरच राहत आहेत. यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांचाही समावेश मोठा आहे. मुंबईत सध्या कडाक्याची थंडी पडत असताना हे रहिवासी जीव मुठीत धरून रस्त्यावर राहत आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास ‘म्हाडा’ जबाबदार राहील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
निर्मलनगरमधील इतर 16 इमारतींच्या डेव्हलपमेंटमध्ये रहिवाशांना 550 चौरस फुटांचे घर देण्यात येत आहे. मग आमच्यावरच अन्याय का? 40 वर्षे राहिल्यानंतर पुन्हा आम्हाला ट्रांझिस्ट कॅम्पमध्येच का कोंबता, असा सवाल निर्मलनगर-खेरवाडी येथील माजी नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांनी केला आहे. आम्ही आमच्या गिरगावच्या घरावरील हक्क सोडायला तयार आहोत. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी हक्काचे घर हवे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.