लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 5 जवान शहीद

जम्मू-कश्मीरात पूंछ जिह्यात लष्करी वाहन 350 फूट दरीत कोसळले. या भयंकर अपघातात पाच जवान शहीद झाले असून पाचजण जखमी आहेत. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, एका अवघड वळणावरून हे वाहन घसरून दरीत कोसळल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जवानांना घेऊन लष्कराच्या सहा वाहनांचा ताफा बालनोईकडे जात होता. डोंगराळ असलेला हा परिसर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ आहे. सायंकाळी हा अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि हे एक लष्करी वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले. त्यात 18 जवान होते. पाच जवानांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. अपघातानंतर लष्कराकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. या वाहनाचे वजन 2.5 टन आहे. दरम्यान, जखमी जवानांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या महिन्यातही अपघात झाला होता

4 नोव्हेंबर रोजी राजौरी जिल्ह्यातील बडोग गावाजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून एका जवानाचा मृत्यू झाला होता, तर एकजण जखमी झाला होता. दरम्यान, 2 नोव्हेंबरला एक कार डोंगराळ रस्त्यावरून खोल दरीत कोसळली. त्यात एक महिला आणि तिच्या 10 महिन्यांच्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता.

हिमवृष्टी, उणे तापमान, कमी दृश्यमानता

जम्मू-कश्मीरात अनेक भागांत हिमवृष्टी सुरू असून तापमानात प्रचंड घट झाली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीरात अपघातांमध्ये वाढ झाली आहे.