रुपया रसातळाला; इंधन आणखी भडकणार, डॉलरच्या तुलनेत 7 पैशांची घसरण; महागाई वाढणार

रुपया रसातळाला गेला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत 7 पैशांची घसरण दिसली. या घसरणीसह रुपया 85.11 रुपये प्रतिडॉलरच्या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर बंद झाला. याआधी 19 डिसेंबर रोज रुपया डॉलरच्या तुलनेत 85.08वर बंद झाला होता. रुपया गडगडल्याने आता परदेशी वस्तू महागण्याची शक्यता आहे.

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे क्रूड तेलाच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरची प्रचंड मागणी आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे क्रूड तेलाच्या किमती वाढल्या आहेत असे फॉरेन करन्सी ट्रेडर्सने म्हटले आहे. क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंधनाचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने दोन वेळा व्याजदरात कपात केली. त्यानंतर डॉलर आणखी मजबूत झाला आणि 0.38 टक्क्यांनी वाढून तब्बल 107.75वर पोहोचला.

निर्यात महागणार; पर्यटन आणि शिक्षणही महागणार

रुपयात घसरण झाल्यामुळे हिंदुस्थानसाठी अनेक गोष्टींची निर्यात करणे महाग होणार आहे. परदेशात पर्यटन करणे आणि शिक्षण घेणे महाग होण्याची शक्यता आहे. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 50 इतकी होती तेव्हा अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना 50 रुपयांत 1 डॉलर मिळत होता. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 85.06 रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे शुल्क आणि रहाणे तसेच खाणे आणि इतर जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत.

रुपया घसरण्याचे फायदे

  • व्यापाऱ्यांसाठी निर्यातीतून प्रचंड फायदा, शेतकऱ्यांसाठी नुकसान
  • परदेशातील पर्यटकांना हिंदुस्थानात फिरणे स्वस्त होईल
  • हिंदुस्थानी वैद्यकीय पर्यटन उद्योगाला फायदा
  • परदेशी डॉलरच्या बदल्यात अधिक पैसे मिळतील

रुपया घसरण्याचे नुकसान

  • इंधन आणि सोन्याच्या किमती वाढणार
  • परदेशातून येणारा कच्चा माल महाग होणार, त्यामुळे महागाई वाढणार
  • परदेशात शिक्षण घेणे, पर्यटन करणे महागणार
  • हिंदुस्थानात परदेशी गुंतवणूक घटणार