विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. पण वाढीव रक्कम देण्यास कॅबिनेटमध्ये अद्याप मंजुरी मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत. हा निधी पुढील सात-आठ दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार असल्याची माहिती ‘एक्स’ या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी विचारणा लाडक्या बहिणींकडून होत होती. विधानसभा निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचारात आणि निवडणूक जाहिरनाम्यात 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नक्की किती रक्कम आणि ही रक्कम कधी मिळणार याबाबतही अनिश्चितता होती. पण वाढीव निधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात सादर करावा लागेल. या प्रस्तावाला मंजुरी द्यावी लागेल. त्यानंतर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे जाईल.
‘एक्स’द्वारे जाहीर
आचारसंहितेमुळे या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. राज्यात आता पुन्हा सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ विस्तारदेखील झाला. आता तर खातेवाटपदेखील झाले आहे. महिला व बालविकास खाते आदिती तटकरेंना मिळाले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासूनच देण्यास सुरुवात केल्याचे जाहीर केले आहे.
पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद
हिवाळी अधिवेशनात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 35 हजार 877 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.