काँग्रेसच्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वत:लाच क्लीन चिट, सर्व आरोप फेटाळले

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदार नोंदणी बोगस मतदान, मतदार यादीतील घोळ, संध्याकाळी सहानंतर वाढलेल्या मतदानाबाबत काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला क्लीट चिट दिली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसला भलेमोठे 66 पानी पत्र पाठवले असून काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आणि पर्यायाने स्वतःलाही क्लीन चिट दिली आहे.

मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार, संध्याकाळनंतर वाढलेले मतदान यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन तक्रार केली होती. मात्र आपण सर्व कायदेशीर प्रक्रिया पाळल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेली उत्तरे

महाराष्ट्रातील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 हजार मतदार नव्याने समाविष्ट केले हा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. प्रत्यक्षात फक्त 6 विधानसभा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीनंतर 50 हजारांहून अधिक मतदारांची नव्याने कायदेशीर प्रक्रिया पाळून नोंदणी झाली.

मतदानाच्या दिवशी संध्याकाळी साडेसहानंतर वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या तक्रारीवरही, कोणत्याही प्रकारचा घोळ अथवा विसंगती नाही. संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली टक्केवारी अंतिम टक्केवारी नसते. फॉर्म 17 एची पडताळणी केल्यानंतर योग्य आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.

प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे फॉर्म 17 सी असतो. मतमोजणीपूर्वी फॉर्म 17 सी मधील आकडेवारी ईव्हीएमच्या आकडेवारीसोबत जुळवली जाते. ही प्रक्रिया उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते.