अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयांची घसरगुंडी सुरूच आहे. रुपया 85.11 रुपये प्रति डॉलर असा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे रुपयांची घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुपयाची घसरण म्हणजे हिंदुस्थानसाठी परदेशातील वस्तूंची आयात महाग होणार असून परदेशात फिरणे आणि शिक्षण घेणेसुद्धा महाग झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते, तेव्हा अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळू शकतो. परंतु आता एका डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 85.11 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी प्रचंड महाग होणार आहेत.
हिंदुस्थानातसुद्धा महागाईचे प्रचंड चटके बसत आहेत. तेलापासून ते साबणापर्यंत आणि खाद्य पदार्थांपासून ते मनोरंजनपर्यंतच्या सर्व गोष्टीसाठी अवाच्या सवा पैसे मोजावे लागत आहेत. गॅस सिलेंडरच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या किमतीने आधीच महागाईत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन थंडीच्या दिवसात जोरदार चटके बसत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार फक्त जास्तीत जास्त टॅक्स वसूल करण्यात दंग असल्याचेही दिसत आहे.