मुद्दा – ‘नीलकमल’ दुर्घटना आणि प्रश्न

>> टिळक उमाजी खाडे

नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ने दिलेल्या धडकेमुळे झालेली दुर्घटना व त्यात नाहक बळी गेलेले 15 निरपराध जीव… हे सगळं काळीज पिळवटून टाकणारे आहे. दोन-तीन दिवस या दुर्घटनेची चर्चा झाली. आता पुन्हा जैसे थे! यातून आम्ही काही शिकणार आहोत की नाही? या दुर्घटनेने निर्माण केलेले प्रश्न अनुत्तरित तर राहणार नाहीत ना?

केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय नौदल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड या दुर्घटनेकडे व ह्या दुर्घटनेच्या कारणांकडे पुरेशा गांभीर्याने पाहणार आहे की नाही? अशा दुर्घटना झाल्यावर यासंबधी चौकशी समित्या वा चौकशी आयोग नेमले जातात आणि अत्यंत कृत्रिमपणे वा यांत्रिक पद्धतीने त्यांचे अहवाल यथावकाश सादर केले जातात आणि तितक्याच निर्विकारपणे ते अहवाल बासनात गुंडाळूनही ठेवले जातात. दोषींवर कठोर कारवाई कधीच का होत नाही ? कायद्यातील पळवाटांचा वा इतर तांत्रिक गोष्टींचा (गैर)फायदा घेऊन दुर्घटनेस जबाबदार असणारे सहीसलामत सुटतात. तोपर्यंत लोकांचा क्षोभ शांत झालेला असतो आणि या घटनादेखील विस्मरणात गेलेल्या असतात. आता याच दुर्घटनेसंदर्भात बोलायचे झाल्यास ‘स्पीड बोटी’च्या इंजिनाची चाचणी सुरू होती, असा मुद्दा नौदलाने पुढे केला आहे. या तांत्रिक मुद्दय़ावर नौदलाच्या ‘स्पीड बोटी’चा चालक कायद्याच्या कचाटय़ातून सहीसलामत ‘निर्दोष’ सुटू शकतो! नौदलाचा हा खुलासा न पटणारा आहे.

या दुर्घटनेचा दुसरा पैलू म्हणजे दुर्घटनाग्रस्त ‘नीलकमल’ बोट! त्या बोटीचा चालक व मालक हेदेखील या दुर्घटनेस तेवढेच जबाबदार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची जलवाहतूक करण्यास ह्या चालक व मालकांना परवानगी मिळतेच कशी? यासंदर्भात काही शासकीय नियम नाहीत का? की येथेही ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होतो? सामान्य माणसाच्या जीवन-मरणाशी संबंधित बाबीकडे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड दुर्लक्ष तर करत नाही ना? या प्रवासी बोटीमध्ये पुरेशी ‘लाईफजॅकेट’ का नव्हती? ही जबाबदारी संबंधित मालकाची व चालकाची नाही का? संबंधित प्रवाशी बोट जीर्णावस्थेत होती का, याचादेखील तपास करावा. यापुढे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांप्रमाणे अशा जीर्ण प्रवाशी बोटी सक्तीने भंगारात काढाव्यात. तसा कायदाच करून त्याची अंमलबजावणी करावी. अशा दुर्घटना घडल्यावरच आपल्याला जाग का येते याचेही यानिमित्ताने सर्वांनीच आत्मपरीक्षण करावे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाहिल्यावर आपले आपत्ती व्यवस्थापन किती कुचकामी आहे, याचीही प्रचीती आली.