श्याम बेनेगल गेले. भारतीय सिनेसृष्टीचा एक आधारवड कोसळला. समांतर सिनेमाच जणू पडद्यावरून नाहीसा झाला. 1970-80 च्या दशकातील समांतर सिनेमा चळवळीचे एक उद्गाते म्हणून श्याम बेनेगल यांच्याकडे पाहिले गेले. वयाच्या 90व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल पाच दशके त्यांचा प्रत्येक श्वास भारतीय सिनेमासाठीच होता. त्यांचा श्वास आणि ध्यास भारतीय सिनेमाचा चेहरा बदलण्यासाठीच होता. भारतीय सिनेमाला ज्यांनी नवनवीन ओळख दिली, व्याख्या दिली त्यात एक महत्त्वाचे नाव होते श्याम बेनेगल. ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. तो जणू सिनेसृष्टीला फुटलेला समांतर सिनेमाचाच ‘अंकुर’ होता. त्यानंतर त्याच दशकात, म्हणजे 1970 ते 1980 या काळात ‘निशांत’, ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘जुबैदा’, ‘भूमिका’, ‘त्रिकाल’, ‘मंथन’ यांसारख्या त्यांच्या इतर दर्जेदार चित्रपटांनी श्याम बेनेगल यांना एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळेच समांतर सिनेमा आणि श्याम बेनेगल हे समीकरण तयार झाले. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या.
एकीकडे तद्दन व्यावसायिक चित्रपटांचा भडिमार होत असताना आशयघन, समाजाला विचार देणारे, समाजातील समस्या प्रश्नांवर बोट ठेवून त्यांना वाचा फोडणारे, समाजात घडत असलेल्या घडामोडींवर नेमकेपणाने भाष्य करून समाजाला योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट बनविणे हे त्या काळी धाडसच होते. श्याम बेनेगल यांनी ते केले, जाणीवपूर्वक केले. कारण तीच त्यांची धारणा होती. म्हणूनच सामाजिक, कलात्मक चित्रपट असूनही रसिकांनी त्यांचे चित्रपट उचलून धरले. ‘जंजीर’सारख्या चित्रपटांच्या वादळातही श्याम बेनेगल यांचा ‘अंकुर’ फुलला. ‘मंथन’, ‘मंडी’, ‘निशांत’ या प्रत्येक सिनेमाने जशी श्याम बेनेगल यांची ओळख वाढत गेली तसा भारतीय सिनेमाचा चेहराही बदलत गेला. ‘अंकुर’पासून सिनेमा आणि राष्ट्रीय पुरस्कार हे श्याम बेनेगल यांच्यासाठी समीकरणच बनले. तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कार बेनेगल यांच्या नावावर आहेत. सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
एकूण 24 चित्रपट, 45 डॉक्युमेंट्रीज आणि दीड हजारावर ऍड फिल्म्स श्याम बेनेगल यांच्या नावावर आहेत. त्यावरूनही त्यांचे भारतीय सिनेमातील स्थान लक्षात येते. बेनेगल यांच्या विचारांना सामाजिक बैठक होती. त्यातूनच सामाजिक प्रश्न आणि समस्यांचे वास्तव त्यांनी पडद्यावर आणले. एवढेच नाही तर शबाना आझमी, स्मिता पाटील, कुलभूषण, अनंत नाग अशा अनेक दमदार कलावंतांना श्याम बेनेगल यांचा परीसस्पर्श झाला आणि त्यांची कारकीर्द बहरली. सामाजिक आशय मांडताना अनेकदा सिनेमा अतिरंजित किंवा भरकटण्याचा धोका असतो. बेनेगल यांचा एकही सिनेमा त्या वाटेने गेला नाही. त्यांचा प्रत्येक सिनेमा, त्याची कथा, त्यातील पात्रे प्रेक्षकांना कायम ‘जिवंत’ वाटली, ‘आपली’ वाटली ती त्यामुळेच. कारण सामाजिक वास्तव मांडतानाही त्यांनी कायम सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले.
प्रयोगशील असतानाही वास्तवाची नाहक, हवी तशी तोडफोड करून ती त्यांनी पडद्यावर दाखवली नाही. कलात्मक चित्रपटांनाही त्या काळात प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली ती केवळ श्याम बेनेगल यांच्यामुळेच. श्याम बेनेगल हे केवळ एक उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक नव्हते. ते यथार्थवादी भारतीय सिनेमाचा श्वास होते. भारतीय समाजातील सामाजिक संताप, संघर्ष, दबलेले हुंकार यांचा मोठय़ा पडद्यावरील ‘आवाज’ होते. हा ‘आवाज’ आता कायमचा शांत झाला आहे!