>> श्रीनिवास बेलसरे
येशूचे आगमनच नाताळ म्हणून साजरे करायचे असते. आपण किती मेजवान्या दिल्या, नातेवाईकांना भेटी दिल्या, काय काय खरेदी केले यापेक्षा आजही नवी वाटणारी त्याची कोणती शिकवण आचरणात आणायचे ठरवले ते महत्त्वाचे! तोच आपल्या हृदयात झालेला प्रभूचा खरा जन्म!
इंग्लंडचे एकेकाळी जगभर पसरलेले साम्राज्य हे काही नाताळ जगभर साजरा होण्याचे एकमेव कारण नाही. कुणालाही चटकन भावणारी येशूची शिकवण हे ते कारण आहे. येशूच्या 4 शिष्यांनी लिहिलेल्या त्याच्या अतिसंक्षिप्त चरित्रात त्याचे एक प्रवचन ‘डोंगरावरले प्रवचन’ म्हणून नोंदविलेले आढळते. त्यात प्रभूच्या शिकवणुकीचा गाभा आहे. त्याचा उपदेश थोडा असूनही जगाला अजून आचरणात आणता आलेला नाही. मात्र त्याचे प्रतिपादन इतके प्रामाणिक आहे की, ते 2023 वर्षांत कुणाला नाकारताही आलेले नाही. गांधीजींनाही या ‘डोंगरावरल्या प्रवचनाने’ प्रभावित केले होते. स्वातंत्र्य मिळवून देणारी ‘सविनय कायदेभंगा’ची अहिंसक चळवळ म्हणजे ‘शत्रूच्या द्वेषाचा प्रतिकार द्वेषाने करू नका, शत्रूवरही प्रेमच करा’ या येशूच्या शिकवणुकीचा राजकीय अनुवाद होता.
मध्य-पूर्वेतील प्रेषितांमध्ये मोशे (मोझेस) हा महत्त्वाचा प्रेषित होऊन गेला. त्याचा ‘तोरा’ हा बायबलच्या जुन्या करारातील भाग आज तीन धर्म आपल्या परंपरेचा भाग मानतात. मोशेनंतर अनेक शतकांनी जन्मलेल्या येशूने मोशेपेक्षा खूप वेगळे विचार मांडले. असे करताना तो म्हणायचा, ‘मी जुने धर्मशास्त्र रद्द करावयास आलेलो नाही तर ‘पूर्ण करायला’ आलो आहे. ‘दाताकरता दात आणि डोळय़ाकरता डोळा’ ही मोशेची रोखठोक न्यायाची संकल्पना येशूने नाकारली. कारण तिच्यात क्षमेला, माणसाच्या अध्यात्मिक उन्नतीला वाव नव्हता.
‘न्याय’ या संकल्पनेच्या पुढचे निरपेक्ष क्षमेचे दैवी पाऊल माणसाने उचलावे ही शिकवण फार मोठी अध्यात्मिक उडी (quantum jump) होती. अत्याचारी माणसाला विरोध न करून विचारात पाडणे, त्याच्यातील चांगुलपणा जागा करणे हा येशूचा मार्ग होता. येशू म्हणतो, ‘जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केले तर त्यात मोठे ते काय? पापी लोकही पापी लोकांवर प्रेम करतातच ना?’ जिथून उसने परत येण्याची खात्री आहे तिथे तुम्ही उसने दिले तर उदारपणा तो काय? पापी लोकही पापी लोकांना उसने देतातच ना? तुम्ही ज्यांच्याकडून परत मिळणार नाही याची खात्री आहे त्यांना उसने द्या. द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करा तरच ती उदारता ठरेल. असे करताना तुम्ही देवाला उसने देत असता. देव त्याची केवढी परतफेड करेल?
‘जसा देव पापी आणि पुण्यवान लोकांच्या शेतात सारखाच पाऊस पाडतो, दोघांनाही सारखाच सूर्यप्रकाश देतो तसे तुम्ही परिपूर्ण व्हा! तुमच्याशी चांगले वागणारे आणि वाईट वागणारे अशा दोन्ही लोकांशी तुम्ही चांगलेच वागा. कारण तुम्ही केवळ एक पशूप्रजाती नाही तर परमेश्वराचे पुत्र आहात. तुम्ही पित्यासारखे पूर्ण व्हा.’ प्रभूच्या शिकवणुकीत माणसातल्या दिव्यत्वाला जागे करणारे आवाहन होते.
एका उदाहरणात व्यभिचाराचा आरोप असलेल्या एका स्त्राrला त्याच्याकडे न्याय करण्यासाठी आणले असता त्याने काढलेला तोडगाही त्याचे अलौकिक चातुर्य सिद्ध करतो. मोशेच्या कायद्यात व्यभिचाऱ्याला दगड मारून ठार करणे ही शिक्षा होती. प्रभू म्हणाला, ‘शिक्षा द्या, परंतु पहिला दगड मात्र त्याने मारावा ज्याने कोणतेच पाप केलेले नाही.’ युक्तिवाद बिनतोड होता. प्रभूच्या शब्दांतील शक्तीमुळे गावकऱ्यांचे अंतर्मन उघडले. प्रत्येकाला आपल्या पापांचा काठोकाठ भरलेला घडा दिसला. एकेक हातातून दगड खाली पडू लागले. लोक चुपचाप निघून गेल्यावर प्रभू त्या बाईला म्हणाला, “जा मुली, यापुढे पाप करू नकोस.’’ किती संक्षिप्त किती प्रभावी संदेश!
येशूने विवाहाला ईश्वरी योजना म्हटले आहे. एकदा ढोंगी शात्र्यांनी त्याला विचारले, ‘गुरुजी, पुरुषाने पत्नीला टाकणे सशास्त्र आहे ना?’ येशू म्हणाला, ‘तुमच्या मनाचा कठीणपणा लक्षात घेऊन मोशेने ती सूटपत्राची तरतूद ठेवली आहे, मात्र विवाहानंतर पती-पत्नी ही एकच होत, वेगळी नव्हेत. “जे ईश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये.’’
आजच्या येशूचे आगमनच नाताळ म्हणून साजरे करायचे असते. आपण किती मेजवान्या दिल्या, नातेवाईकांना भेटी दिल्या, काय काय खरेदी केले यापेक्षा आजही नवी वाटणारी त्याची कोणती शिकवण आचरणात आणायचे ठरवले ते महत्त्वाचे! तोच आपल्या हृदयात झालेला प्रभूचा खरा जन्म!