सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांच्या खुनाचे खरे आरोपी मोकाट आहेत व मुख्यमंत्री फक्त तोंडाने हवा सोडत आहेत. विरोधी पक्षाचे लोक बीड किंवा परभणीत गेले तर ‘हे लोक खुनाचे राजकारण करतात’ असे सरकार कोकलते. मग सरकारने असे खून रोखले पाहिजेत व खून झाले तर खऱ्या आरोपींना गजाआड केले पाहिजे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीत आले, याचा मुख्यमंत्री फडणवीसांना त्रास झाला. सरकारच्या गुंडांनी खून करावेत व विरोधी पक्षाने त्यावर बोलू नये अशी मोदी-फडणवीस वगैरे लोकांची अपेक्षा आहे काय? हा विचार निर्दय व अमानुषपणाचा आहे. सोमनाथ सूर्यवंशी – संतोष देशमुखचे नक्की काय झाले? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उद्या देशद्रोही ठरवू नये म्हणजे झाले!
मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले व आता मंत्र्यांचे बंगले वाटपही पार पडले, पण परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस सरकार देऊ शकलेले नाही. सूर्यवंशी व देशमुख यांचे खून झाले व हे दोन्ही खून सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी ‘एसआयटी’ चौकशीचा जो खेळ मांडला आहे, ती धूळफेक आहे. संतोष देशमुख या सरपंचाची बीडच्या रस्त्यावर निर्घृणपणे हत्या झाली. देशमुख यांना किती निर्घृणपणे मारले याचे हृदय पिळवटून टाकणारे कथन आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केले. आमदार संदीप क्षीरसागर यांनाही हे सर्व सांगताना रडू कोसळले. पण या खून प्रकरणातले खरे आरोपी व सूत्रधार हे सरकारमध्ये सन्मानाने विराजमान आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवतीभवती, मंत्रिमंडळात ते वावरत आहेत. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या परभणीत पोलीस लॉकअपमध्ये झाली. संविधान रक्षणासाठी त्यांचे बलिदान झाले. संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना पोलीस मारहाणीत सूर्यवंशी मरण पावले. हा सरळ सरळ अत्याचार आहे, पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला व आता सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले तर फडणवीस हे वाटाण्यासारखे तडतड करू लागले. फडणवीस म्हणतात, ‘राहुल गांधी हे फक्त राजकीय हेतूने परभणीत आले होते. लोकांमध्ये आणि जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करायचा हे
एकच ध्येय
त्यांचे आहे. तेच काम ते गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत.’ फडणवीस यांचे हे वक्तव्य गांधींपेक्षा नरेंद्र मोदी यांना तंतोतंत लागू होते. देशात जातीय, धार्मिक विद्वेषाचे जे जहर गेल्या दहा वर्षांत पसरले त्या विषाची खाण म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहांकडे बोट दाखवावे लागेल. परभणी व बीडच्या हत्या या जातीय द्वेषातूनच झाल्या व त्यास महाराष्ट्रातले भाजप सरकार जबाबदार आहे. सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते व स्वतः संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते असतानाही त्यांचा खून झाला. नमिता मुंदडा यांच्या निवडणुकीत सरपंच देशमुख हे त्यांच्या गावातील भाजपच्या बुथवर उपस्थित होते. अशा कार्यकर्त्याची हत्या का व्हावी व या हत्येमागे सतत एकच नाव का घेतले जाते? संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवार यांचे उजवे हात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘खास’ वाल्मीक कराडचे नाव घेतले जाते. हे सत्य असेल तर कराड यांना वाचविण्यासाठी धनंजय मुंडे हे नक्कीच प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत नुसत्या संशयावरून पोलिसांनी अनेकांना उलटे टांगून गुन्ह्याची कबुली घेतली, पण बीडच्या गुन्ह्यात पोलीस स्वतःच भेदरलेले दिसतात. कराड यांचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर फडणवीस यांची नैतिकता व निष्पक्षता उजळून निघाली असती, पण मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे केले नाही. कारण धनंजय मुंडे यांचे प्रमुख पालनहार तेच आहेत. वाल्मीक कराड यांचा प्रभाव इतका की, देशमुख खून प्रकरणात त्यांना अद्याप पोलिसांनी
साधे चौकशीलाही
बोलावलेले नाही. बीड जिल्ह्यातली ही दहशत महाराष्ट्राला परवडणारी नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केज तालुक्यात मोर्चा काढला. संशयित कराड हा सरकारी मदतीने फरार असल्याचा त्यांचा आरोप आहे व हा आरोप खरा वाटावा असे वातावरण सध्या दिसत आहे. गुन्हेगार कितीही मोठा असो, त्याला सोडणार नाही. पाताळात लपला असला तरी त्याला शोधून काढू, अशा वल्गना मुख्यमंत्री करतात, पण सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांच्या खुनाचे खरे आरोपी मोकाट आहेत व मुख्यमंत्री फक्त तोंडाने हवा सोडत आहेत. देशमुख यांची पत्नी व मुलांचा आक्रोश त्यांना विचलित करीत नाही. परभणीत सूर्यवंशी यांच्या खुनाला वाचा फुटली तरी सत्य झाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात. विरोधी पक्षाचे लोक बीड किंवा परभणीत गेले तर ‘हे लोक खुनाचे राजकारण करतात’ असे सरकार कोकलते. मग सरकारने असे खून रोखले पाहिजेत व खून झाले तर खऱ्या आरोपींना गजाआड केले पाहिजे. परभणी-बीड खून प्रकरणांतील आरोपींना फाशी देऊ अशी घोषणा अजित पवार यांनी केली, मात्र फाशी देण्यासाठी आधी आरोपींना पकडावे लागेल आणि आज तरी आरोपींना सरकारचे संरक्षण आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीत आले, याचा मुख्यमंत्री फडणवीसांना त्रास झाला. सरकारच्या गुंडांनी खून करावेत व विरोधी पक्षाने त्यावर बोलू नये अशी मोदी-फडणवीस वगैरे लोकांची अपेक्षा आहे काय? हा विचार निर्दय व अमानुषपणाचा आहे. सोमनाथ सूर्यवंशी – संतोष देशमुखचे नक्की काय झाले? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उद्या देशद्रोही ठरवू नये म्हणजे झाले!