सुप्रसिद्ध आयफेल टॉवरला आग, 1200 लोकांची सुटका

पॅरीसमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला आग लागल्याची घटना घडली. टॉवरमधील लिफ्टमध्ये सकाळी 10.50 वाजता ही आग लागली. आग लागल्यानंतर तात्काळ संपूर्ण टॉवर खाली करण्यात आला असून, 1200 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. टॉवर बंद करण्यात आला असून, आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

आयफेल टॉवरची देखरेख करणारी कंपनी SETE च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एलिव्हेटेड पॉवर रेल्वेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अलार्म वाजला, असे मिरर यूकेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. टॉवरच्या दुसऱ्या आणि टॉपच्या मजल्यावरही अशीच समस्या दिसून आली. शॉर्ट सर्किटनंतर अलार्म वाजू लागला.

आयफेल टॉवरला दररोज 25 हजाराहून अधिक पर्यटक भेट देतात. नाताळच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात पर्यटक आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी आले होते. यादरम्यान काही पर्यटकांना धूर निघताना दिसला आणि त्यानंतर अलार्मही वाजला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.