मोहन भागवत हिंदू धर्माचे ठेकेदार नाही, स्वामी रामभद्राचार्य यांची टीका

मोहन भागवत एका संघटनेचे प्रमुख होऊ शकतात पण आमचे नाही, असे विधान स्वामी रामभद्राचार्य यांनी केले आहे. तसेच मोहन भागवत हिंदू धर्माचे ठेकेदार नाही, अशी टीकाही स्वामी रामभद्राचार्य यांनी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी रामभद्राचार्य म्हणाले की, हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या परत मिळाल्या पाहिजेत. आणि त्या मिळवल्याच पाहिजेत. त्यासाठी हिंदूंनी साम दाम दंड भेद नीती वापरावी. मोहन भागवत म्हणाले की मशिदींखाली जुनी मंदिरं शोधणं बंद केले पाहिजे. पण भागवत यांचे हे विधान वैयक्तिक असेल. मोहन भागवत एका संघटनेचे प्रमुख असू शकतात पण ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. ते आमचे अनुशासक होते, आम्ही त्यांचे अनुशासक आहोत. मोहन भागवत हे हिंदू धर्माचे ठेकेदार नाहीत. हिंदू धर्माची व्यवस्था हिंदू आचार्यांच्या हाती आहे. मोहन भागवत एका संघटनेचे प्रमुख होऊ शकतात पण आमचे नाही. मोहन भागवत संपूर्ण हिंदुस्थानचे प्रतिनिधी नाहीत. राम मंदिर बनवलं म्हणजे कुणी हिंदुंचा नेता होऊ शकतो हे त्यांचे विधान दुर्दैवी आहे असेही स्वामी रामभद्राचार्य म्हणाले.