विनोद कांबळीनं ICU च्या बेडवरून दिली प्रतिक्रिया; सचिन तेंडुलकरबाबत म्हणाला, ‘त्यानं कायमच मला…’

टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली असून त्याच्यावर भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच त्याची विचारपूस करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली. यावेळी विनोद कांबळी भावूक झाला. त्याने गाणेही म्हटले. एवढेच नाही तर त्याचा एकेकाळचा सहकारी आणि मित्र सचिन तेंडुलकर याचा उल्लेख करत त्याने संकटकाळात साथ दिलेल्या सर्वांचे आभारही मानले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना विनोद कांबळी म्हणाला की, माझी तब्येत ठीक असून हळूहळू मी बरा होत आहे. आमच्या कुटुंबात तीन डावखुरे क्रिकेटपटू असून मी क्रिकेटपासून कधीही दूर जाणार नाही. कारण मी किती शतकं आणि द्विशतकं ठोकलेली आहेत हे मला चांगले ठाऊक आहे. मी सचिन तेंडुलकर याचेही आभार मानतो. त्याचे आशीर्वाद आणि त्याचा पाठिंबा कायमच माझ्या पाठीशी आहे. यासह प्रशिक्षक आणि गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे नाव घेत त्यांचाही यात मोठा वाटा असल्याचे कांबळी म्हणाला.

दरम्यान, सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने विनोद कांबळी याला भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनोदला न्यूट्रिशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम झाला आहे. युरिन इन्फेक्शनमुळे मसल्स क्रॅम्प झाला आहे. त्यामुळे विनोद धड बसूही शकत नाही.