महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभागृहात अवमान जनक वक्तव्य केले. याचा निषेध व्यक्त करत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला.
लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमान जनक व्यक्तव्य केले. गृहमंत्री अमित शहा जो पर्यत माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत, तो पर्यत काँग्रेस जनआंदोलन करेल, असे खासादर रविंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे. यासह परभणी व बीड घटनेचा निषेध देखील खासदार रविंद्र चव्हाण यांनी केला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तीव्र निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. खासदार रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, बी.आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.