हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंधांचे धडधडीत पुरावे! अंजली दमानिया यांनी X वर बॉम्ब फोडला

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. यावरून विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या प्रकरणावरून आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर बॉम्ब फोडला आहे. अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र शेअर करत मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंध उघड केले आहेत.

हे वाचा – संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींचा 9 जानेवारीला बंद

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे व संतोष देशमुख प्रकरणात चर्चेत आलेला वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी पुरावा म्हणून थेट डिजिटल सात बाराच आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र. जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले. 3554 गुंठे जमीन (88 एकर 34 गुंठे)’, असे दमानिया यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.