अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमी वर्दळ असते. सण, उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक असतात. भाविकांना पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी लाखो रुपयांची फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली. परंतु, वापराविना ही फिरती शौचालये एकाच ठिकाणी थांबून देखभालीअभावी नष्ट होत आहेत.
अक्कलकोट तीर्थक्षेत्री दिवसेंदिवस येणाऱ्या स्वामिभक्तांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने भाविकांसाठी प्रसाधनगृहे, वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. येथे भाविकांसाठी फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली. त्यासाठी वेळोवेळी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, अनेक फिरती शौचालये वापराविना एकाच जागेवर धूळखात पडून असल्याने ती निकामी झाल्याचे दिसत आहेत. नगरपालिकेच्या जुना दवाखाना आवारात देखभाल व दुरुस्तीअभावी निकामी झालेली फिरती शौचालये व नवीन फिरती शौचालये वापराविना एकाच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा होणारा खर्च टाळावा आणि येथे कायमस्वरूपी शौचालये बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करावीत, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
“अक्कलकोट नगरपालिकेच्या जुन्या दवाखानाच्या आवारात अनेक फिरती शौचालये तशीच पडून असल्याने ती सडून निकामी झाली आहेत. या शौचालयांसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. नवीन फिरती शौचालयेही येथेच ठाण मांडून थांबली आहेत. त्यामुळे शहरातील विविध मंदिर परिसरात कायमस्वरूपी शौचालये ही बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बांधण्यात यावीत – वसंत देडे, समाजसेवक, अक्कलकोट