परप्रांतीय पांडेच्या उलट्या बोंबा; मराठी कुटुंबानेच मारहाण केल्याची तक्रार, स्वतःच्या बचावासाठी नौटंकी

कल्याणमध्ये उत्तम पांडे या परप्रांतीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पांडे फरार झाला. अटकेच्या भीतीने आता त्याने पीडित कुटुंबानेच आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद मानपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. पांडेची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा संताप कल्याण, डोंबिवलीत आहे.

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून एका माथेफिरू परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला गुंडांकरवी बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच मराठी कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा परप्रांतीय कुटुंबातील उत्तम पांडे याने विनयभंग केला होता. याचे तीव्र पडसाद कल्याण, डोंबिवलीत उमटले आहेत. विनयभंग प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मराठी कुटुंब परप्रांतीय कुटुंबीयांकडे गेले असता पांडेच्या कुटुंबाने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली होती. यानंतर पांडे पसार झाला होता. मात्र रविवारी त्याने मराठी कुटुंबातील तीन सदस्यांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री मारहाणीची तक्रार दाखल केली. पांडेला अटक करणाऐवजी त्याची खोटी तक्रार दाखल करून घेणाऱ्या पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

हीच का पोलिसांची कर्तव्यदक्षता?

आरोपी उत्तम पांडे हा नवी मुंबई येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे नाटक करत आहे. मुलीचा विनयभंग आणि तिच्या पालकांना मारहाण करणाऱ्या परप्रांतीय पांडेला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. हॉस्पिटलमध्ये बसून पांडे पोलिसांत तक्रार देतो आणि कोणतीही चौकशी न करता पोलीस त्याची फिर्याद नोंदवतात याला काय म्हणावे, अशा उद्विग्न प्रतिक्रिया कल्याणमध्ये व्यक्त होत आहेत. मराठी कुटुंबावर अन्याय होऊनही त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल सर्वत्र संताप आहे.

कल्याणमध्ये गेल्या चार दिवसांपासून घडत असलेल्या घटनांची सरकारने गंभीर दखल घ्यावी. अशा प्रकरणांच्या तपासात वेळकाढूपणा करून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावी. मराठी कुटुंबीयांवर जे हल्ल्याचे प्रकार सुरू आहेत ते त्वरित थांबले नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.

दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक