श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनउटी पूजा या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीतील पूजांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
याबाबत मंदिर समितीच्या दि. 20 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या बैठकीत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील ‘श्रीं’च्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाहापूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुसऱ्या टप्प्यात दि. 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.
असे आहे देणगी मूल्य
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25 हजार व 11 हजार, पाद्यपूजेसाठी 5 हजार, तुळशी पूजेसाठी 2100 इतके देणगी मूल्य आहे.