मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास करताना मृत तरुणालाच आरोपी बनवणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने दणका दिला. चुकीच्या तपासावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी चूक सुधारली आणि आरोपपत्रातील दुचाकीस्वार तरुणाचे नाव वगळले. मुलाला मृत्यूनंतर आरोपीच्या पिंजऱयात उभ्या करणाऱया पोलिसांविरुद्ध तरुणाच्या आईने उच्च न्यायालयापर्यंत लढा देत आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून दिला.
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावाजवळ 12 सप्टेंबर 2020 रोजी रात्री दुचाकी व ट्रकमध्ये अपघात झाला होता. या अपघातात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार सचिन घाटगे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तपास करणाऱया पोलिसांनी सचिनला जबाबदार ठरवले आणि गुन्हा दाखल केला. मृत सचिनला आरोपी बनवण्याच्या पोलिसांच्या कारभाराविरुद्ध सचिनची आई आशा घाटगे यांनी अॅड. रेश्मा मुथा, अॅड. सुयोग वेसवीकर आणि अॅड. संदीप आग्रे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना मृत सचिनचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास भाग पाडले आणि याचिका निकाली काढली.
याचिकेतील दावा
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघाताचा पोलीस तपास योग्य दिशेने केला नाही. दुचाकीस्वार सचिन ट्रकखाली चिरडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. असे असताना पोलिसांनी फुटेजकडे दुर्लक्ष केले. अपघाताला ट्रकचालक जबाबदार असताना मृत सचिनला आरोपी बनवले, असा दावा सचिनच्या आईने याचिकेत केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने अपघाताच्या फेरतपासाचा आदेश खेड पोलिसांना दिला होता.
मृत व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र कसे काय दाखल केले?
न्यायालयाच्या आदेशानुसार खेड पोलिसांनी अपघाताचा फेरतपास करून दुसऱयांदा आरोपपत्र दाखल केले. मात्र त्यातही ट्रकचालक राजन चौहानसोबत दुचाकीस्वार सचिनचे आरोपी म्हणून नाव ठेवले होते. पोलिसांचा हा गलथान कारभार अॅड. रेश्मा मुथा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणला. त्यांचा युक्तिवाद खंडपीठाने ग्राह्य धरला आणि मृत व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र कसे काय दाखल केले? असा संतप्त सवाल करीत पोलिसांचे कान उपटले. त्यानंतर मृत सचिनचे नाव वगळून पोलिसांनी तिसरे आरोपपत्र दाखल केले.