फिनिक्स मॉल येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. दुकानात काम करणाऱ्या महिलेने शिताफीने संधी साधत दोन लाख 45 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लंपास केल्या होत्या. कोणाला शंका येऊ नये याकरिता तिने खोटे दागिने तेथे ठेवले. पण घाटकोपर पोलिसांनी अचूक तपास करीत ही चोरी करणाऱ्या महिलेला वाशी येथून पकडले. तिच्याकडून एक लाख 75 हजार किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिनिक्स मॉल असून या मॉलमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दुकान आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री या दुकानातील दोन लाख 45 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक तसेच निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर खरमाटे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरी दुकानात काम करणाऱया महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वाशी येथे राहणाऱया रेश्मा मोहम्मद इब्राहिम शेख या महिलेला पकडले. तिच्याकडून 71 हजार रुपये किमतीची लगड व एक लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
संधीचे सोने केले अन् गजाआड झाली
रेश्मा शेख ही गेल्या तीन महिन्यांपासून मॉलमधील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानात कामावर होती. या कालावधीत तिने संधी मिळेल तसे हळूहळू करून दोन सोन्याच्या चैन लंपास केल्या. कोणाला शंका येऊ नये याकरिता तिने चोरलेल्या सोन्याच्या ठिकाणी बनावट सोने ठेवले. पण ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आला आणि पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संधीचे सोने करणाऱया रेश्माच्या हातात बेडय़ा पडल्या.