मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्यात आज सामंजस्य करार झाला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, मुंबईची ओळख अविरत कार्य करणाऱयांचे महानगर अशी आहे. मुंबईतील खाद्यपदार्थ विव्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्न पुरवावे यासाठी परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त सभागृहात झालेल्या सामंजस्य करारावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी, सहसंचालक डॉ. के. यू. मेथेकर यांच्यासह उपायुक्त संजोग कबरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.
असे दिले जाईल प्रशिक्षण
- प्रशिक्षणासाठी पालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन केली जाईल. त्यात महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील.
- समन्वय समितीमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रशासकीय कामकाज, देखरेख, अंमलबजावणी व पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल.
- प्रशिक्षण अंमलबजावणीच्या यशासाठी एक मानांकन ठरवण्यात येईल व त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.