गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा; स्थानिकांची जोरदार निदर्शने

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमधील अहमदाबाद येथे अज्ञातांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला. अहमदाबाद शहरातील खोखरा परिसरातील श्री केके शास्त्री महाविद्यालयासमोर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नाक आणि चष्मा अज्ञातांनी फोडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 196 आणि 198 अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी पुतळ्याजवळ निदर्शने करत तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.