जगभरातील महत्वाच्या घडामोडी

काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार सोडावा

काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार करू नये. ममता बॅनर्जी यांच्यात क्षमता आहे, तसेच इतर नेतेही आहेत जे आघाडीचे नेतृत्व करू शकतात. त्यांना नेतृत्व करायचे असेल तर त्यांना तसे करू द्यावे, असे मत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करते याने काहीच फरक पडत नाही. कारण काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे असेल. विरोधी आघाडीत हा महत्त्वाचा पक्ष असेल असेही त्यांनी म्हटले.

दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या दिल्या

गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारने तरुणांना 10 लाख कायमस्वरुपी नोकऱ्या दिल्या. हा सरकारचा विक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. रोजगार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले. अशाप्रकारे याआधीच्या कुठल्याही सरकारने नोकऱ्या दिल्या नव्हत्या असा दावाही त्यांनी केला. आमच्या सरकारने नेहमीच तरुण वर्गासाठी धोरणे आखली. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांमधील कार्यकुशलता ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले असेही मोदी म्हणाले.

शेख हसीना यांना बांगलादेशात पाठवा

बांगलादेशातील सत्तापालटानंतर हिंदुस्थानात आश्रयास असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशने एक डिप्लोमॅटिक नोट पाठवली आहे. आम्ही हिंदुस्थानला संदेशाद्वारे विनंती केली असून शेख हसीना यांना न्याय प्रक्रियेसाठी मायदेशात यावे लागेल, असे बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी सांगितले. याआधी गृहविभागाचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी हसीना यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा अमेरिका दौरा

हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 24 ते 29 डिसेंबर या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर असतील. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे या दौऱ्याची माहिती दिली. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये तीन दिवसांचा अमेरिका दौरा केला होता.

सीबीआय आज संसद परिसरात

संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झालेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे दोन खासदार जखमी झाले होते. या घटनेच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा 24 डिसेंबर रोजी संसद परिसराला भेट देणार आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार असून याबाबत दिल्ली गुन्हे शाखेच्या इंटर स्टेट सेलचे पथक संसद सचिवांकडून परवानगी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. याप्रकरणी जखमी खासदारांची प्रकृती पाहून मगच त्यांचे जबाबही नोंदवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.

2027 पर्यंत हिंदुस्थानच्या डेटा सेंटरची क्षमता दुप्पट होणार

वाढत्या डिजिटलायझेशनमुळे हिंदुस्थानच्या डेटा सेंटर उद्योगाच्या क्षमतेत 2027 पर्यंत दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार असल्याचे ‘क्रिसिल रेटिंग्ज’च्या अहवालात म्हटले आहे. कोरोना काळानंतर डिजिटलायझेशनकडे लोक मोठ्या संख्येने वळले. त्यामुळे क्लाउड स्टोरेजमध्ये गुंतवणूक वाढल्याने डेटा सेंटरची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जनरेटिव्ह एआयचा वाढत चाललेला प्रभाव ही नवी कार्यसंस्कृती डेटा सेंटरच्या पथ्यावर पडली आहे. नेटवर्क सर्व्हरचा एक मोठा समूह असलेल्या डेटा सेंटरचा वापर मोठ्या प्रमाणात डेटा वितरणासाठी केला जातो.