मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली असून देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 9 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद पाळतील अशी घोषणा आज केली.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्यभरातले सरपंच मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का, हा प्रश्न सरपंचांना पडला आहे. त्यामुळेच राज्यात परत कोणाचीही अशी हत्या करण्याची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करावी, कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चा
दोन आठवड्यांनंतरही संतोष देशमुख हत्येतील आरोपी सापडत नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून नव्हे, तर मराठवाड्यातूनही लोक बीडमध्ये दाखल होणार आहेत.
मंत्र्यांची रीघ… तरीही मारेकरी मोकाट
संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. विधिमंडळात पाच दिवस या घटनेवरून धुमश्चक्री झाली. संजय शिरसाट, उदय सामंत, मेघना बोर्डीकर अशा मंत्र्यांनी गावात येऊन शोबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही देशमुख कुटुंबाला भेटून गेले. एवढे असूनही या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आरोपी सापडत नसल्याने आरोप झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र नवे पोलीस अधीक्षक येऊनही तपासात कोणतीही प्रगती नसल्याने पोलीस काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जिह्यासह राज्य आणि राज्याबाहेरूनही सामान्य माणूस मस्साजोगमध्ये येऊन धीर देत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख कुटुंबाची भेट घेऊन घटनेवर चिंता व्यक्त केली.