सामन्याच्या 11 व्या मिनिटाला चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्ली संघाने गुजरात जाएंट्स संघाला 45-31 असे हरविले आणि प्रो कबड्डी लीगमधील प्ले ऑफमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. मध्यंतराला दिल्ली संघाकडे तीन गुणांची आघाडी होती.
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने यापूर्वीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांनी यापूर्वी झालेल्या 21 सामन्यांपैकी बारा लढतींमध्ये विजय मिळवला आहे? आजच्या लढतीत दिल्लीचे पारडे जड राहील अशी अपेक्षा होती. प्ले ऑफमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील असा अंदाज होता. गुजरात संघाने 21 सामन्यांपैकी फक्त पाचच सामने जिंकले असून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा यापूर्वी संपुष्टात आले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळत यंदाच्या स्पर्धेची यशस्वी सांगता करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते.
गुजरातच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध खेळ करीत धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी नवव्या मिनिटालाच दिल्ली संघावर लोण चढवत खळबळ उडवून दिली. त्यावेळी त्यांच्याकडे 10-5 अशी आघाडी आली होती. मात्र लोण स्वीकारल्यानंतर दिल्लीचे खेळाडू खडबडून जागे झाले असावेत. कारण त्यांनी अष्टपैलू खेळ करीत चौदाव्या मिनिटाला पहिला लोण नोंदविला आणि 15-14 अशी आघाडी मिळविली. त्याचे मुख्य श्रेय कर्णधार आशु मलिक व नवीन कुमार यांच्या चौफेर चढायांना द्यावे लागेल. उत्तरार्धात दिल्ली संघाने सामन्यावरील पकड कायम कशी राहील हेच डावपेच केले आणि सातत्याने आपल्याकडेच आघाडी ठेवली.