ऋतुराज गायकवाडची वादळी शतकी खेळी

कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 148 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत एक दणकेबाज विजय मिळविला. सेनादलाचा 9 गडी आणि 178 चेंडू राखून विजय मिळवित महाराष्ट्राने लागोपाठच्या दोन विजयासह ‘ब’ गटातून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

सेनादलाकडून मिळालेले 205 धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने 20.2 षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. यात गायकवाडने 74 चेंडूंत नाबाद 148 धावांची वादळी खेळी सजविताना 16 चौकारांसह तब्बल 11 षटकारांचा घणाघात केला. त्याआधी, सेनादलाने 48 षटकांत 204 धावसंख्या उभारली. यात कर्णधार मोहित अहलावतने (61) अर्धशतकी खेळी केली. सूरज वशिष्ट (नाबाद 22), रजत पालीवाल (22), पूनम पूनिया (26) हे धावांची वीशी ओलांडणारे फलंदाज ठरले.