देशभरात डिजिटल अरेस्टचा सिलसिला सुरूच, इंजिनीअरकडून 11 कोटी उकळले

बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल 11.8 कोटी रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सॉफ्टवेअर अभियंता विक्रम (नाव बदलले आहे) यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख ट्रायचे अधिकारी अशी करून दिली. तुमच्या नावाने खरेदी केलेल्या सिमकार्डवरून बेकायदेशीर जाहिराती आणि धमकीचे संदेश पाठवले जात आहे, असे सांगितले. यासाठी तुमचे आधारकार्ड वापरले. सिमकार्डला ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असून कुलाबा सायबर पोलीस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगितले.

काही दिवसांनंतर दुसऱ्या ठगाने अभियंत्याशी दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून दिली. आधारचा वापर मनी लॉण्डरिंगसाठी बँक खाती उघडण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. या अभियंत्याला तिसऱ्यांदा ढगांचा फोन आला. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला स्काईप ऍप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून मुंबई पोलिसांचा असल्याचा दावा केला. अभियंत्याला पडताळणीसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. अटकेच्या भीतीने अभियंत्याने प्रथम एका बँक खात्यात 75 लाख रुपये आणि नंतर दुसऱ्या खात्यात 3.41 कोटी रुपये ट्रान्सफर केले. 12 डिसेंबरपर्यंत 11.8 कोटी रुपये फसवणूक करणाऱ्यांच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.