भारतात हिंदू–मुसलमानांत तणाव निर्माण करून निवडणुका लढविणारे कुवेतमध्ये जाऊन त्या देशाचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारतात. मग भारतात सोंगे–ढोंगे का करता? सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी मोदींसारख्या शहाण्यांना शब्दांचा मार दिला आहे. सरसंघचालक म्हणतात, ‘‘धर्माचे अर्धवट ज्ञान अधर्माकडे नेते. धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार चुकीच्या समजुतीने होतात. धर्माचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे होतात. अर्धवट ज्ञानाने फुगलेल्या माणसाला ब्रह्मदेवही समजावू शकत नाही!’’ भारतात ब्रह्मदेवानेही हात टेकले आहेत. ‘मुबारक अल कबीरां’ना समजावायचे कोणी?
पंतप्रधान मोदी हे कुवेत दौऱ्यावर गेले. कुवेत हे एक इस्लामी राष्ट्र आहे. कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद-अल जबा-अल सबा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ ‘खाना’ ठेवला व कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या किताबाने मोदींचा सन्मान केला. मोदी यांना आतापर्यंत असे 20 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत व त्यातील बहुसंख्य पुरस्कार हे इस्लामी राष्ट्रांकडून प्राप्त झाले आहेत. कुवेतच्या अमीराने ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देताच पंतप्रधान मोदी यांचा चेहरा तेजाने उजळून निघाला. त्यांनी हा सन्मान भारताच्या लोकांना समर्पित केला. मोदी यांना कुवेतच्या राजाने पुरस्कार देताच भाजप कार्यालयांत, संघ शाखांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी साखर वाटली. मोदी यांनी कुवेतच्या राजाने दिलेला पुरस्कार कपाळी लावला. मोदी हे जगातील एक सन्माननीय व्यक्ती आहेत व त्यांचे जीवन पुरस्कारापलीकडे आहे. भारतासारख्या देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या नेमणुका ते करतात. त्यामुळे ‘शिष्टाचार’ मोडून हे लोक मोदींसमोर हात जोडून, वाकून उभे असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध होत असतात. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील भयंकर युद्धे थांबवली, अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. युक्रेनने अलीकडेच रशियावर ड्रोन हल्ला केला. त्याआधी युक्रेनने क्रेमलिन येथे रशियाच्या परमाणू हत्यार प्रमुखाची हत्या घडवून पुतीन यांना धक्का दिला, पण या घटना फारशा गांभीर्याने घेता येणार नाहीत, कारण या किरकोळ घटना आहेत. महाराष्ट्राच्या बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी आंदोलकाचा
पोलीस कोठडीत मृत्यू
झाला. मोदींच्या भक्तांना या हत्या किरकोळ वाटतात. अशा बारीक सारीक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात घडत असतात, पण मोदी यांना कुवेतचा ‘मुबारक अल कबीर’ हा सन्मान मिळणे महत्त्वाचे आहे. मोदी यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा नव्याने खोवला आहे. उद्या त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशाण-ए-पाकिस्तान’ही मिळू शकतो. बांगलादेशात हिंदू मारला जात असला तरी बांगलादेशचा सर्वोच्च पुरस्कारही त्यांना मिळेल व तो स्वीकारण्यासाठी ते ढाक्यात जातील. बांगलादेश मुक्ती संग्रामात आपला कसा सहभाग होता व आपण हाती शस्त्र घेऊन त्या लढ्यात कसे उतरलो होतो याची रंजक कहाणी मोदी यांनी जाहीर केलीच आहे. त्यामुळे बांगलादेशने मोदी यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार द्यायला हरकत नाही. पंतप्रधान मोदी यांना जगात जातील तिथे पुरस्कार मिळत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मोदी हे भारतात येताच ख्रिसमसच्या पार्टीतही सामील होणार आहेत. दिल्लीत कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियातर्फे ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. मोदी तेथे जातील व ख्रिस्ती बांधवांसोबत सण साजरा करतील. 1944 साली कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्सची स्थापना झाली व तेव्हापासून त्यांच्या ख्रिसमस पार्टीत जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. तेथे ते ख्रिस्ती समुदायाचे प्रमुख नेते, कार्डिनल बिशप, चर्चचे प्रमुख पाद्री मंडळींशी चर्चा करतील. केकही खातील. कुवेतमध्ये इस्लामी राष्ट्राचा पुरस्कार व भारतात ख्रिस्ती बांधवांबरोबर ‘पार्टी’ असे एकंदरीत मोदीचे सेक्युलर कार्यक्रम आहेत. मोदी यांची
‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा
त्यांना स्वतःला लागू होत नाही. कुवेतच्या राजाने राहुल गांधींना पुरस्कार दिला असता तर येथील मोदी अंधभक्तांनी थयथयाट केला असता व कुवेतचा पुरस्कार घेतला म्हणून भारतातील हिंदुत्व खतऱ्यात आले असते, पण मोदींनी कुवेतचा पुरस्कार घेतल्यामुळे बांगलादेश व भारतातील हिंदू सेफ झाला. दिल्लीतील ख्रिश्चन बांधवांच्या पार्टीत प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी सहभागी झाल्या असत्या तर मोदी भक्तांनी विषारी फूत्कार सोडले असते व प्रकरण थेट इटलीतील सोनिया वंशापर्यंत नेऊन गोंधळ घातला असता, पण ख्रिस्ती बांधवांशी मोदी यांचे जुने व भावनिक नाते असल्याने मोदी हे सांताक्लॉज किंवा पाद्रय़ांच्या शुभ्र वेशात हाती ‘क्रॉस’ घेऊन दिल्लीच्या पार्टीत सामील झाले तरी आश्चर्य वाटायला नको. पंतप्रधान मोदी भारतात हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन असे वाद लावतात व परदेशात जाऊन अमीर व शेखांकडून पुरस्कार घेतात! भारतात मात्र मशिदींच्या खाली खोदकाम करून दंगल घडवायचे काम करतात. मोदी यांनी धर्मरक्षणाचे काम स्वीकारले असेल तर त्यांनी ते उघडपणे करावे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रयत्न करू नये. भारतात हिंदू-मुसलमानांत तणाव निर्माण करून निवडणुका लढविणारे कुवेतमध्ये जाऊन त्या देशाचा ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारतात. मग भारतात सोंगे-ढोंगे का करता? सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी मोदींसारख्या शहाण्यांना शब्दांचा मार दिला आहे. सरसंघचालक म्हणतात, ‘‘धर्माचे अर्धवट ज्ञान अधर्माकडे नेते. धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार चुकीच्या समजुतीने होतात. धर्माचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे होतात. अर्धवट ज्ञानाने फुगलेल्या माणसाला ब्रह्मदेवही समजावू शकत नाही!’’ भारतात ब्रह्मदेवानेही हात टेकले आहेत. ‘मुबारक अल कबीरां’ना समजावायचे कोणी?