देशमुख प्रकरणावर एकही मंत्री का बोलला नाही? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सुत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी सरकरामधील मंत्र्यांना या हत्याप्रकरणावरून लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी सर्वात पहिल्यांदा आपण केली आहे. कोणतीही चौकशी केली त्याला काही अर्थ नाही. याबाबतच्या सर्व सत्य गोष्टी बाहेर येतील. आपल्याला देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. मला आश्चर्य वाटते की, मंत्रिमंडळात मंत्री आहेत. एकही मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, एकही मंत्री याबाबत का बोलला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. समाजापेक्षा मंत्रिपद महत्वाचे आहे का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला.

महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुंबीयांना दोन मंत्रि‍पदे मिळाले असून येथील सरपंच हत्याप्रकरणावरुन आता वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सवाल केला आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला मिळेल यावर बोलताना, आम्हाला काय करायचे पालकमंत्री पदाबाबत असेही आव्हाड यांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचे आतमधून किती गुळपीट आहे, हेच मला सरकारला दाखवायचा आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले. मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मीक कराड पकडला जाईल, अशी अपेक्षा करता येत नाही, असेही आव्हाड म्हणाले.