धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; नाना पटोले यांची मागणी

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परभणी येथील दौर्‍याच्या निमित्ताने नाना पटोले सकाळी नांदेड येथे आले. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या शवविच्छेदनाचा आलेला अहवाल भयावह आहे. त्यांना ज्या पध्दतीने मारले ते संतापजनक आहे. या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली. मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सत्य परिस्थिती सभागृहात मांडली. मात्र मुख्यमंत्र्यांनी टाईमपास केला व माफियाला ताकद देण्याचे काम त्यांनी केले, असा आरोपही पटोले यांनी केला.

वाल्मिकी कराड याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे हे आरोपीला पाठिशी घालत असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, असेही पटोले यांनी सांगितले. यासंदर्भात अजित पवार धनंजय मुंडेवर कारवाई करतील का, असा सवालही त्यांनी विचारला. वाल्मिकी कराड हा माफिया आहे, त्याची दहशत आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास व त्याला अटक करण्यास पोलीस मागेपुढे का बघत आहेत, असा सवाल त्यांनी केला. वाल्मिकी कराडला तात्काळ अटक करावी, असे ते म्हणाले.

परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. विमानातून उतरल्यानंतर ते थेट परभणीकडे रवाना झाले. यावेळी नाना पटोले, रमेश चेन्नीतल्ला, खासदार वर्षा गायकवाड, प्रवक्ते अतुल लोंढे, खासदार रविंद्र चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.