धक्कादायक! ट्रेनमध्ये महिलेला जिवंत जाळले, आरोपीचे क्रूरकृत्य पाहून पोलिसांचाही संताप

स्टेशनवर उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये महिलेला लायटरच्या मदतीने जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर या घटनेमुळे हादरले असून हे कृत्य अत्यंत विकृत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

न्यूयॉर्क पोस्टने या संदर्भात वृत्त दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (22 डिसेंबर 2024) पहाटे ही घटना घडली आहे. एक महिला स्थानकामध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या एका डब्ब्यात झोपली होती. याचवेळी आरोपीने डब्ब्यात जात लायटरच्या सहाय्याने महिलेच्या कपड्यांना आग लावली. काहीच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले आणि पाहता पाहता महिला आगीत होरपळून गेली. गस्त गालत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धुर पाहिला आणि त्यांनी डब्ब्याच्या दिशेने धाव घेत अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग विझवली. परंतु या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या कपड्यांना आग लावल्यानंतर आरोपी डब्ब्याच्या समोरच बसून महिलेला जिवंत जळताना एकटक पाहत होता. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचे वर्णन अत्यंत क्रूर असे केले आहे. तसेच या भयंकर घटनेमुळे न्यूयॉर्क शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास पोलीस करत आहेत.