वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अंधाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना हरयाणामधील पंचकुला शहरामध्ये घडली आहे. पंचकुला शहरातील पिंजोर येथील हॉटेल सल्तनतमध्ये रात्री दोनच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये तिघांवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात विनीत आणि विक्की या तरुणांचा मृत्यू झाला आहे. तसेच निया या तरुणीचाही मृत्यू झाला आहे. विक्की आणि विनीत हे दोघेही हिस्सारचे रहिवासी असून निया दिल्लीची रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. तसेच मृत्त विक्की याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याची माहिती, पंचकुलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद कंबोज यांनी दिली आहे. आज तक या वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.