महड-ताकई हा रस्ता जेमतेम तीन ते चार किलोमीटरचा, पण या रस्त्याची सध्या अतिशय दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यापैकी अर्धा किमीचा रस्ता वनखात्याच्या अंतर्गत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे डांबरीकरण रखडले असून वरद विनायक गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक व ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत आणि ‘विघ्न’ दूर करावेत, असे साकडे घालण्यात आले आहे.
महडचा गणपती हा अष्टविनायकापैकी एक असून महड-ताकई रस्ता पेण- खोपोली मार्गाजवळून जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. ऑगस्ट महिन्यात जे. एम. म्हात्रे इन्फ्रा यांनी हे खड्डे भरले होते. चार महिने वाहतूक पूर्ववत झाली, पण आता पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महड गावातून ताकई फाट्याला जोडणारा अर्धा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत तर उर्वरित रस्ता हा वनखात्याच्या ताब्यात आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन
महड-ताकई रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी न करता डांबरीकरण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन खालापूर वनविभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिले आहे.