निसर्गरम्य माथेरानमध्ये सहा महिन्यांपूर्वी ई-रिक्षांचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला. त्याची मुदत 25 डिसेंबर रोजी संपत आहे. मात्र त्यानंतरही ई-रिक्षांची सुविधा कायम राहणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी आज दिली. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून माथेरानमध्ये आता ई-रिक्षा कायम धावणार आहेत. पर्यटन वाढीसाठीदेखील या ई-रिक्षांचा फायदाच होणार आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य माथेरानची सैर करण्यासाठी ठाणे जिह्याच्या विविध भागांतून मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे मानवी रिक्षा धावत होत्या. मात्र या रिक्षा बंद करून ई-रिक्षा सुरू झाल्या. त्यामुळे माथेरानचे पर्यावरणदेखील राखले जाणार आहे. सहा महिन्यांपूर्वी ई-रिक्षांचे पायलट प्रोजेक्ट सुरू झाला. या रिक्षा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये व्यवस्थित धावत असल्याचे दिसून आले. तसा अहवालही न्यायालयाला सादर करण्यात आला.
वाहनांची संख्या वाढवा
सनियंत्रण समितीने 20 परवानाधारक हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी दिली होती. मुसळधार पावसातदेखील या रिक्षा व्यवस्थित चालल्या. रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयीन लढाईही लढली. आता या ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आज यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. त्यावेळी ई-रिक्षा कायम धावतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या रिक्षांची संख्या वाढवणे तसेच 24 तास रिक्षा चालवण्यास परवानगी देणे, अशा मागण्या स्थानिकांनी यावेळी केल्या.