पालकमंत्री कोण होणार? 11 जिल्ह्यात ‘36चा आकडा’!

महिनाभरापूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पूर्ण बहुमत मिळूनही तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री कोण होणार यावरून 36 जिह्यांच्या महाराष्ट्रातील 11 जिह्यांमध्ये ‘36 चा आकडा’ निर्माण झाला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरासह रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, बीड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आदी जिह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू निर्माण झाली आहे. यातच शिंदे गटाची जुन्याच खात्यावर बोळवण करताना उत्पादन शुल्कसारखे महत्त्वाचे खातेही अजित पवार गटाला देण्यात आल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री ठरला असताना मंत्रिमंडळ विस्तारालाच तब्बल 23 दिवस गेले. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनखात्याच्या मंत्र्यांसह नागपूर हिवाळी अधिवेशन पार पडले. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद वाढत चालले आहेत. बीडमध्ये मुंडे भावा-बहिणींना मंत्रिपद मिळाल्यामुळे जिह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी दोघांकडूनही दावा ठोकला जात आहे.

रायगडमध्ये वाद शिगेला

महायुतीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात वारंवार आश्वासन, बोळवण झाल्यानंतरही वेटिंगवर राहिलेले शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्या गळय़ात अखेर नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ पडली आहे. गोगावले यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरही डोळा आहे. त्याच वेळी आदिती तटकरे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याने वाद पेटणार आहे.

छत्रपती संभाजीनगरवर भाजप-शिंदे गटात कुरघोडी

संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये कुरघोडी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्यालाच जिह्याचे पालकमंत्री पद मिळणार असून फक्त घोषणा होणे बाकी असल्याचे जाहीरच करून टाकले आहे. तर दुसरीकडे याच ठिकाणचे ओबीसी कल्याण व दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांनीसुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर जाहीर दावा केल्याने या ठिकाणीदेखील भाजप आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू असल्याचे दिसत आहे.

महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी – पटोले

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही खातेवाटपाला महिना लागला. आता याच मलईदार खात्यांसाठी आपापसात लढून यांचा कार्यक्रम संपणार असल्याचे सांगत महायुतीची परिस्थिती काwरवांसारखी झाली असल्याचा जोरदार हल्ला आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर चढवला. सरकारचे शनिवारी खातेवाटप झाले. आता पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे यासाठी भांडणे होतील, असा दावाही पटोले यांनी केला.