मुंबईवर विषारी धुरक्याची चादर; सरासरी ‘एक्यूआय’ 200च्या वर, अनेक ठिकाणी ‘खराब’ हवेची नोंद

मुंबईत थंडीचा कडाका वाढत असताना वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेत धूळ-धूर साचून राहण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. बहुतांशी ठिकाणी विषारी धुरक्याची चादर पसरल्याने दुश्यमानता कमी झालेली आढळून आली. यातच सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 200 ते 300 च्या दरम्यान नोंदवला गेल्याने ‘खराब’ हवेची नोंद झाली. या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली असून घशाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेव्हीनगर कुलाबा, वरळी, माझगाव, शिवडी, बोरिवली आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचे समोर आले आहे. शनिवारी तर बोरिवली आणि मालाड पश्चिमच्या हवेचा एक्यूआय 308 इतका नोंदवला गेला. रविवारीदेखील मुंबईत अनेक भागात हवेची गुणवत्ता खालावल्याचे आणि धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाली.

अशी ठरते हवेची गुणवत्ता

0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते. तर 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’  असल्याचे मानले जाते.