अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन

तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादस्थित घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन केले. यावेळी त्यांनी तोडफोड आणि दगडफेक करून सर्वांचे लक्ष वेधले. हे विद्यार्थी उस्मानिया विद्यापीठातील आहेत. ’पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये द्यावे, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. ‘चित्रपटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले, मात्र ज्यांनी तो पाहिला तेच मरत आहेत,’ अशा आशयाचे पोस्टर आंदोलकांनी झळकावले. दोन आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना याआधीच 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच जखमींवर स्वखर्चाने उपचार करणार असल्याचे त्याने सांगितले होते.