यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात दिल्लीचा चित्ररथ नाकारल्यावरून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विविध राज्यांच्या चित्ररथांवरून भाजपप्रणीत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीसोबतच असे का केले, असा सवालही त्यांनी केला आहे.
दिल्ली देशाची राजधानी असतानाही सातत्याने दिल्लीला संचलनात चित्ररथ सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली. हे दिल्लीसोबतच का, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. देशाची राजधानी असल्याने दर वर्षीच्या प्रजासत्ताक संचलनात दिल्लीच्या चित्ररथाचा सहभाग असायलाच हवा. परंतु गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या चित्ररथाला संचलनात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे. केंद्र सरकार दिल्लीतील लोकांचा इतका तिरस्कार का करते, दिल्लीला अशी वागणूक मिळत असतानाही येथील लोक त्यांना मतदान का करतात, असे अनेक प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.
महिला सन्मान योजनेसाठी आजपासून नोंदणी
18 वर्षांवरील महिलांना महिन्याला एक हजार रुपये आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देणाऱ्या संजीवन योजनेसाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास महिलांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवून 2 हजार 100 करण्यात येईल, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले. दरम्यान, कुणीही नोंदणीसाठी बाहेर कुठेही जाऊ नये. आपचे कार्यकर्ते तुमच्या दरवाजापर्यंत येतील असेही ते म्हणाले.