मोदी सरकारने देशद्रोह केला; राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केली, 300 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक हॅक केल्यावरून काँग्रेसचा हल्ला

मोदी सरकारने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पत्रकार, कार्यकर्ते, न्यायाधीश, विरोधी पक्षातील नेते, स्वपक्षातील नेते यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक हॅक केले. अमेरिकेतील एका न्यायालयाने पेगासस स्पायवेअरसाठी इस्रायलच्या एनएओ ग्रुपला जबाबदार धरले. या निकालामुळे मोदी सरकारने या स्पायवेअरच्या माध्यमातून हिंदुस्थानातील 300 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक लक्ष्य केल्याच्या आरोपांना बळकटी मिळाली असून मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केली आहे, अशा शब्दांत काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला आहे.

मेटा प्लॅटफॉर्मच्या व्हॉट्सअ‍ॅपने इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने स्पायवेअर इन्स्टॉल करण्यासाठी मेसेजिंग अ‍ॅपमधील असुरक्षिततेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. त्यावर अमेरिकन न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपच्या बाजूने निर्णय दिला आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. या प्रकरणी आता काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी एक्सवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणाचा निकाल सिद्ध करतो की, अवैध स्पायवेअर रॅकेटमध्ये भारतीयांचे 300 व्हॉट्सअॅप क्रमांक कसे लक्ष्य केले गेले.

काँग्रेसचे सरकारला प्रश्न

ज्या 300 जणांना लक्ष्य केले होते ते कोण आहेत? यातील दोन केंद्रीय मंत्री आणि तीन विरोधी पक्षांचे नेते कोण आहेत? लक्ष्य करण्यात आलेल्या अधिकारी, पत्रकार आणि उद्योगपतींमध्ये कोणाचा समावेश आहे या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावीत अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्याचबरोबर मेटाविरुद्ध एनएओ यांच्या खटल्याबाबत अमेरिकन न्यायालयाने दिलेल्या निकालाची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का? सर्वोच्च न्यायालय पेगासस स्पायवेअरवरील तांत्रिक तज्ञांच्या समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी पावले उचलणार आहे का? सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी अमेरिकन न्यायालयाचा निकाल पाहता पुढील चौकशी करणार का असे प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

भारतीय जनता पार्टी नाही, भारतीय जासूस पार्टी

मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नाव बदलून आता भारतीय जासूस पार्टी ठेवायला हवे, तर जनता आता म्हणत आहे ‘अब की बार देशद्रोही जासूस सरकार’ असा सणसणीत टोला काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी लगावला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

कॅलिफोर्नियातील ऑकलंड जिल्हा न्यायाधीश फिलिस हॅमिल्टन यांनी व्हॉट्सअॅपचा प्रस्ताव मंजूर करत हॅकिंगसाठी एनएसओ ग्रुपला जबाबदार धरले. प्रायव्हसीचे उल्लंघन करत अनेक युजर्सच्या डिव्हायसेसमध्ये पेगासस स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचा आरोप करत व्हॉट्सअ‍ॅपने एनएसओ विरुद्ध 2019 मध्ये खटला दाखल केला. खटल्यानुसार, एनएसओ ग्रुपमुळे त्यांना पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसह एक हजार 400 लोकांवर लक्ष ठेवता आले. यात 300 हिंदुस्थानी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांचाही समावेश आहे.