देशभरात थंडीचा कडाका वाढला असून उत्तर हिंदुस्थानात पारा घसरला आहे. जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरूच आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने गारठा वाढला आहे. पाऊस, थंडीमुळे नागरिकांनी आरोग्य जपण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत दूषित हवेनंतर थंडीचा कहर कायम आहे. पंजाब, हरयाणामध्येही थंडीच्या लाटेमुळे तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी धुके पडले असून अमृतसर, तरनतारन, भटिंडा, लुधियाना आणि बर्नाला येथे 100 मीटरवर दृश्यमानता नोंदवण्यात आली.
कश्मीरात शाळा, महाविद्यालयांना हिवाळी सुट्ट्या जाहीर
जम्मू-कश्मीर सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांना हिवाळी सुट्टी जाहीर केली. कश्मीर विभागातील सरकारी पदवी महाविद्यालये आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील महाविद्यालये 27 डिसेंबर ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हिवाळी सुट्टी पाळतील. जम्मू विभागातील उन्हाळी विभागातील महाविद्यालये 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2025पर्यंत सुट्टी साजरी करतील. सरकारने यापूर्वीच कश्मीर झोन आणि जम्मू विभागातील हिवाळी विभागातील शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.