लग्न हे जोडीदारांचा परस्परांवरील विश्वास, सहवास आणि विचार-अनुभवांची देवाणघेवाण यावर टिकणारे नाते आहे. त्यामुळे जर दीर्घकाळ जोडीदारांची एकमेकांना साथ नसेल तर ते लग्न केवळ ’औपचारिक बंधन’ म्हणून शिल्लक राहते, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले.
दीर्घकाळ अलिप्त राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअर दाम्पत्याला घटस्फोट मंजूर करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दाम्पत्याचा अलिप्त राहण्याचा अवधी तसेच दोघांमध्ये असलेले टोकाचे मतभेद यावरून विवाह कायम टिकण्याची कोणतीच शक्यता नाही. ज्यावेळी पती-पत्नी दीर्घकाळ एकमेकांपासून अलिप्त राहतात त्यावेळी त्यांचे वैवाहिक बंधन केवळ एक कायदेशीर औपचारिकता बनून राहते, असे मत खंडपीठाने नोंदवले.
तणाव, वाद हे काही लग्नाचे हेतू नाहीत!
लग्नाचा हेतू तणाव आणि वाद नाही, तर दोघे आनंदी तसेच परस्परांबद्दल आदर असणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा लग्न दोघांसाठी दुःख आणि तणावाचे कारण बनते त्यावेळी जबरदस्तीने ते नाते टिकवून ठेवणे अशक्य असते, असेही खंडपीठ म्हणाले आणि 20 वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याला घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणातील पतीने पत्नीला भरपाई म्हणून 50 लाख रुपये, मुलीचे शिक्षण व भविष्यातील खर्चासाठी 50 लाख रुपये चार महिन्यांत द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलेला कोर्टाचा झटका
क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजूर करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महिलेने अपील दाखल केले होते. तिचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. तिचे वर्तन प्रचंड मानसिक आणि भावनिक त्रास देणारे असल्याचे आहे, हे दाखवून देणारे सबळ पुरावे पतीने सादर केले आहेत. पती व सासरच्या लोकांविरुद्ध खोट्या, तथ्यहीन फौजदारी तक्रारी दाखल करण्याने केवळ नात्यामध्ये कटुता येत नाही, तर पतीच्या प्रतिमेला आणि मनःशांतीला मोठा धक्का बसतो, असे निरीक्षण न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळताना नोंदवले.