आदित्य कौलगीचा अष्टपैलू खेळ, तळाच्या आर्यनकुमार आणि अमन सिंगने एक तासभर किल्ला लढवल्यामुळे गणपत भुवड एकादश संघाने सदाशिव सातघरे एकादश संघावर नाममात्र 6 धावांची आघाडी मिळवत सामन्यात सरशी मिळवली. ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित तुकाराम सुर्वे स्मृती 16 वर्षे वयोगटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सदाशिव सातघरे एकादश संघाच्या 211 धावांना उत्तर देताना गणपत भुवड संघाने 217 धावा करत पहिल्या डावात आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना श्रवण गवेने 67 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. अमोघ पाटीलने 45 आणि आदित्य मंडलिकने 34 धावा केल्या. आदित्य कौलगीने 6 विकेट मिळवत सातघरे संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.
उत्तरादाखल पार्थ राणे (26), आदित्य कौलगी (32), विहान तांबडकर (31), शौर्य साळुंखेने 22 धावा करत संघाला द्विशतकी धावसंख्येच्या नजीक नेले, पण मधली फळीची घसरगुंडी उडाल्यामुळे गणपत भुवड संघ अडचणीत आला. नाजूक परिस्थिती असताना आर्यनकुमारने नाबाद 4 आणि अमन सिंगने 16 धावा करत संघासाठी आवश्यक असणारी आघाडी मिळवून दिली. विजय पालने तीन, अन्मय म्हात्रे आणि अद्विक मंडलिक प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः सदाशिव सातघरे एकादश संघ ः पहिला डाव ः 57.3 षटकांत सर्वबाद 211 (अमोघ पाटील 45, श्रवण गवे 67, अद्विक मंडलिक 34, आदित्य कौलगी 19-6-48-6, 1-35-1) विरुद्ध गणपत भुवड एकादश संघ ः पहिला डाव ः 76 षटकात 9 बाद 217 (पार्थ राणे 26, शौर्य साळुंखे 22, आदित्य कौलगी 32, विहान तांबडकर 31, अमन सिंग 16, आर्यनकुमार नाबाद 4, विजय पाल 20-4-47-3, अन्मय म्हात्रे 9-2-19-2, अद्विक मंडलिक 19-5-51-2).