चॅम्पियन्स ट्रॉफी अन् हिंदुस्थान दौऱ्यासाठी रुटचे पुनरागमन

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा आणि हिंदुस्थानच्या दौऱ्यासाठी रविवारी 15 सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा केली. या निवड झालेल्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्सचा समावेश नसून, जो रूटने तब्बल वर्षभरानंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन केले आहे. जोस बटलरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असेल.

इंग्लंडचा संघ 22 फेब्रुवारी ते 12 जानेवारीदरम्यान हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असेल. या दौऱ्यावर इंग्लंड-हिंदुस्थान दरम्यान पाच टी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका रंगणार आहे, मात्र या द्विपक्षीय मालिकेच्या वेळापत्रकाची अद्यापि घोषणा झालेली नाहीये. हिंदुस्थानात 2023 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीमुळे जो रुटला वन डे संघातून वगळण्यात आले होते. त्याचा वर्षभरानंतर वन डे संघात समावेश करण्यात आला असून रेहान अहमदला केवळ टी-20 क्रिकेटमध्ये खेळविण्यात येणार आहे. बेन स्टोक्सला याच महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱया कसोटीत दुखापत झाली होती. तो दुखापतीतून सावरला आहे की नाही याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाहीये.

आर्चर, वुड, एटिंकसन या वेगवान त्रिकुटाचा समावेश

150 प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चरने दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेस मुकलेला मार्क वुडचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर 2023 पासून वन डे क्रिकेट न खेळणाऱ्या गोलंदाज-अष्टपैलू गस एटिंकसनचेही इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. याचबरोबर ब्रायडन कार्स व साकिब महमूद यांनाही चांगल्या फॉर्ममुळे वन डे संघात संधी मिळाली आहे.